पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दावरवाडी सोनवाडी, व दाववाडी कुतूबखेडा रोडवर भर दिवसा महिलांना लुटमारीचे प्रकार वाढले असून या घडलेल्या लुटमारीच्या प्रकाराची पाचोड पोलीस स्टेशनचे अधिकारी तक्रारदारांच्या तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी दावरवाडी येथील एका बँकेचे २५ लाख रुपये लुटण्याचा प्रकार घडला होता. तसेच शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांचे अंगावरील दागिने ओरबडण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी दावरवाडी सोनवाडी रोड वरून शेतात जाणाऱ्या शारदाबाई भरत मोरे या महिलेस दोन अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्या कानातील कुडके आणि कर्णफुले जबरदस्तीने ओरबडून घेतले. यामुळे या महिलेच्या कानास इजा झाली असून या महिलेच्या अंगावरील पाच ते सात ग्राम सोन्याचे दागिने या चोरट्यांनी लांबवले.
या संदर्भात महिलेने मोबाईल वरून आपल्या नातेवाईकांना संपर्क साधून माहिती दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व चोरट्यांचा शोध घेतला परंतु चोरटे पसार झाले. दरम्यान नातेवाईकांनी जखमी महिलेस पाचोड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान याच दिवशी सुनिता अशोक सरगर या महिलेस त्रिकूट गॅस एजन्सी जवळ दाववाडी कुतुबखेडा रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरून पाठलाग करून लुटण्याचा प्रकार केला होता परंतु सदरील महिलेने धाव घेतल्याने त्या बचावल्या.
दरम्यान मागील वर्षी निता शंकर सरगर या महिलेस अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडले होते त्यांच्याही कानाला गंभीर इजा झाली होती. त्या महिलेचे नातेवाईक पाचोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेले असता पाचोड पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. दरम्यान याच परिसरात जानकर व अशोक सरगर यांच्या शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु पाचोड पोलीस तक्रारदारांच्या तक्रार दाखल करून घेत नाहीत लुटमारीच्या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांत मितीचे वातावरण पसरले आहे.













